Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

चार ते पाच महिन्यांपासून मानधन नाही तरीही शिक्षक देत आहेत सेवा !

एका शिक्षकाला काय पाहिजे ? असा प्रश्न विचारला तर आपसूकच उत्तर येईल 'शाळा आणि विद्यार्थी'. शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त असलेल्या पेसा क्षेत्रांतील शाळांत आवश्यक असलेली शिक्षक पदे भरून काढण्याकरिता म्हणजेच विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान नको व्हायला आणि त्यांचा शैक्षणिक हक्क देण्यासाठी तात्काळ मानधन तत्त्वावर सध्या झालेल्या TAIT 2022 , रिटायर्ड शिक्षक व उपलब्ध TET/CTET Qualified Candidates मधून हि मानधन तत्वावरची शासनाने भरती केली.


पेसा क्षेत्र असलेल्या अनेक जिल्ह्यांत अशा प्रकारची भरती घेण्यात आली त्यात गडचिरोली जिल्ह्यात मोठया प्रमाणावर असलेल्या रिक्त जागी हि भरती घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या, नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक तरुणांनी हि संधी स्वीकारली. केवळ आणि केवळ शिक्षण क्षेत्रात आवड असल्याने अनेकांनी आपले घर सोडून, जुने जॉब सोडून ह्या भरतीत आणि सेवेत रुजू झाले. कोणी विवाहित असलेली आणि आपले लहान बाळ असतांनाही एक चांगला काम मिळाला म्हणून मुलाबाळांना काही काळ दूर सोडून रुजू झालेत, काही जण आपल्या ठरलेल्या लग्नाला पुढे सरकवत ह्या सेवेत आहेत तर काही आपल्या रोजच्या जमलेल्या कामाला दूर सारून मानधन असेलही तरी एक सन्मानजनक जॉब आहे म्हणुनच आजही ह्यात समरस झालेला आहे. 

अतिशय दुर्गम भागात असलेल्या शाळांत ह्यातली काही तरूण, तरूणी शिक्षण सेवा देत आहेत. परभणी, बीड सारख्या जिल्ह्यांतील उमेदवार गडचिरोली जिल्ह्यात येऊन मानधन ह्यावर काम करत आहेत त्यातीलच एक महिला शिक्षिका जी ह्या भरतीत जॉईन होऊन सेवा देते आहे ती नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून तिने जॉईन होतांना आपल्या वडिलांना सोबत घेऊन आली आणि वाटलं की regular मानधन सुरू झाले की परत जाईन आणि तोपर्यंत मुलीचं मन पण रमेल. गडचिरोली जिल्ह्यात मन रमले खरे पण दुर्दैव हे की, लागल्या पासून मानधन मिळालेच नाही. मग मन रमणार तरी कसे ? 

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही शिक्षक अथवा शिक्षव्यवस्थेतील जुळेलेल्या व्यक्तीला आवश्यक बाब म्हणजे त्याला जगायला आणि त्याच्या कुटुंबाचे, स्वतःचे पोट भरायला ज्या आधाराची गरज असते ती मानधन स्वरुपातील आहे. पण तेच वेळेवर मिळत नसेल तर मग जगायचे तरी कसे ?  शाळेच्याच भिंतीवर आपण वाचतो, " उपाशी पोटी देशभक्ती होत नाही." मग शिक्षकच उपाशी राहत असेल आणि त्याचा कुटुंबच आर्थिक अडचणीत असेल तर तो शिक्षक ते शिक्षिका आपल्या मानसिकतेवर कीती नियंत्रण ठेवून अध्यापन करत असेल ?

वर्तमान पत्रात, ह्यात कार्यरत शिक्षक मित्रांशी बोलतांना त्यांच्याकडून मानधन बाबत असेल प्रश्र्ने ऐकायला मिळत आहेत ही वस्तुस्थिती मनाला हेलावून टाकणारी आहे. ५००, १००० किमी वरून येऊन भाड्याने राहून, किराया भरणे, खाण्याचा प्रश्न, कौटुंबिक जबाबदारी ह्यात गुरफटून गेलेल्या शिक्षक - शिक्षिका तरुणांची काय अवस्था होत आहे ह्याकडे सबंधित प्रशासनाने व शासनाने लक्ष देऊन त्यांचे प्रश्न मिटविणे खरच अत्यावशक आहे.

अनेक वेळा मानधन विषयी जिल्हा परीषद व पंचायत समिती येथे पाठपुरावा करावा लागतो आणि तो करूनही हा प्रश्न सुटत नाही. निधी कमी आला, हिशेब जुळत नाही वैगेरे वैगेरे उत्तर दिले जाते. जिल्हा किंवा पंचायत समितीच्या दूर असलेल्या शाळांतील शिक्षक वारंवार पाठपुरावा करायला येऊ शकत नाही कारण पुन्हा सुट्टी कधी काढायची? आणि सुट्टी मिळालीच तर दुसऱ्याच दिवशी नोटीस द्वारे कळविले जाते की, मानधन विषयी पं. स. ला येण्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते आणि ह्याच मुळे अनेक शिक्षक मानधन विषयी बोलण्यास हजरही राहू शकत नाहीत. मग ह्यांचा प्रश्न मांडणार कोण? कोणाशी ते बोलतील आणि प्रश्न सुटणार कसा ?

केवळ पैसा भेटते म्हणून ह्या सेवेत रुजू झाले हा गैरसमज अजिबात नाही कारण एकतर तुटपुंज्या पगारात, दुर्गम भागात काम करण्याची त्यांची ईच्छा ही हेच सांगते की, त्यांना विद्यार्थी आणि शाळा ह्यात काम करायचं आहे, शिक्षक म्हणून सेवा करायची आहे. आणि म्हणुनच पाच महिन्यांपासून मानधन न मिळताही ते आज प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. शासन व प्रशासनाने त्यांचे मनोबल वाढेल असे करावे म्हणजे त्यांना कोणताही पुरस्कार अथवा खूप मोठे धनही नको, केवळ आणि केवळ त्यांना जगता यावे त्यांच्या कुटुंबांना आधार मिळावा यासाठी ठरलेले मानधन वेळेवर मिळावे हिच पेसा क्षेत्रात शिक्षण सेवा देणाऱ्या शिक्षकांची मागणी आहे. 


साईनाथ गेडाम

पेसा मानधन शिक्षक, पंचायत समिती, कुरखेडा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या