Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

चोरांच्या मनात मोदके | गडचिरोलीकर

 "चोरांच्या मनात मोदके", 


"चोर" हा शब्द ऐकूनच आपल्यासमोर सोन्याची दागिने, पैशे, यांची चोरी व लुट याबद्दल काहीतरी लिहीले असावं ही कल्पना वरील शीर्षक पाहून बहुतेक लोकांच्या मनात आलीच असावी.

मी माझ्या जीवनातील काही प्रसंग आपल्यासमोर मांडतोय ते प्रसंग म्हणजेच शुद्ध चोरीच. पण ती दागिने, मौल्यवान वस्तू यांची चोरी नसून वेगळेच काहीतरी आहेत, चला तर मग सुरुवात करूया चोरीला.


मला चोरीची सवय मुळात केव्हा लागली असावी नेमकं कळत नाही पण सर्वात आधी केलेली चोरी आठवते ती "वटाण्याची". मी ४ थ्या इयत्तेत असताना जि. प. शाळेच्या मागील बाजूस असलेल्या बालवाडीतून बाईची नजर चुकवून वाटाणे चोरले. अंगणवाडी बंद असतांना खिडकीतून हात घालून वाटाणे चोरलेला क्षण पुरेपूर आठवतो, पण आज आपण उगाचच लहान बाळांचे खाद्य चोरायचो याची खंत वाटते.

गणेशोत्सव दरम्यान केलेली योजनाबद्ध "मोदक चोरी" आजही भयानक चोरीची कला त्या काळी अवगत होती असेच वाटते. गणेशोत्सव हा आमचा आवडता उत्सव आणि आम्ही सर्व मित्र पूर्वी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करायचो, नैवेद्य म्हणून काही ना काही बाप्पा समोर रोजच मांडत असत एके दिवशी संध्याकाळच्या पूजेला नैवेद्य म्हणून काकूंनी पेढ्याचे मोदक बनवून बाप्पांसमोर ठेवले, आमच्यातील काही मंडळी गणेशाजवळ मांडलेली साहित्य ( खायची) लगेच फस्त करत असत. तेव्हा वरिष्ठ मंडळींकडून आदेश देण्यात आले की मोदक खाऊ नका त्यातला मी एक वरिष्ठ आणि हाच शब्द सगळ्यांना भोवला की खरच मोदक लय भारी असावीत म्हणूनच तर तशी सूचना देण्यात आली आहे असे प्रत्येक मोदक चोरास वाटत होत, पण गम्मत अशी होती की मोदक चोरून खायचं बहुतेक जणांना होत पण सगळे आपल्याच मनात प्लॅन करून बसले. सर्वजण जेवण उरकून बाप्पाच्या स्टेजकडे जमा झाली. रोज दोघे निघे जण बाप्पा जवळ झोपणारी मंडळी आज भरपूर दिसत होती. त्या सगळ्यांना स्टेजवर जागा न झाल्याने काही जण बाहेर रेतीवर घरून आणलेल्या बोतऱ्या (अंथरूण) टाकून हातपाय पसारली, स्टेजवर "सुख्या" असल्याने स्टेज मोडून पडेल असा समजून मीही रेतीवरच धाव घेतली, लगेच नितेशनी माझ्या कानात मोदक चोरायच विषय हळुवार फुंकला आणि विषय फक्त दोघातच असावा ही अट घातली. रात्री १० वाजली तरी काही जण कथा सांगत मधेच उचक्या देऊन हसत होती. तेव्हा काकूंनी सगळ्यांना चुपचाप झोपण्याची ताकीद दिली. आणि आमच्या चोरीला वळण दिलं. दरम्यान एक तास आम्ही दोघे टकमक ढगांनी झाकलेल्या चंद्राकडे पाहत हाताने ढग सरकवू पाहत होतो.   


एक दीड तासाचा अवधी उलटला होता डोळे बारीक बारीक होत होते तेव्हा मी नितेशला कळवलं की आपला कार्यक्रम सुरू करूया आणि ते सांगताना आमच्यात गुप्तता इतकी होती की मायक्रो वॉईस रेकॉर्डिंग डिव्हाईस लावलं तरी ते साउंड रेकॉर्ड होणार नाही इतक्या हळू आम्ही बोलायचो. दोघांची सहमती झाली. आम्ही आता संपुर्ण शांत झालो आणि आमच्यातुन कोणीतरी एक जण जाणार इतक्यातच बाजूचा एक जण हळूच उठला आणि अलगदपणे चालत स्टेजजवळ गेला आम्ही दोघे कुतूहलाने पाहत होतो पटकन स्टेजवर चढून त्याने हातात येतील तेवढे मोदक पकडून परत आला आणि आश्चर्य तो आल्यानंतर त्याच्या बाजूचे तिघे जण उठून बसले आणि ते चौघे जण मिळून भकाभक मोदक खायला लागली. हे विहंगम दृष्य पाहत असताना वाटत होते की, काही लोकं आपल्यापेक्षा कीती भारी प्लॅनिंग करुन असतात ज्यांना आपण टार्गेट करतो अगदी त्याच टार्गेट साठी. आणि हे आपल्यापेक्षा दर्जेदार चोर निघाले होते. आणि खातांना सुध्दा भणक लागू देत नव्हते. आम्हाला कळून चुकलं की प्लॅन फक्त आमचाच नव्हता तर त्यांचा पण होता, आम्ही तसेच पडून त्यांना झोपेच्या सोंगेतून पाहत होतो. ते चारही जण मोदक फस्त करत होती व परत एकदा त्यांच्यातला एक जण उठला आणि परत मोदकाकडे जायला निघाला आता मात्र आम्हाला राहावल नाही आणि त्यांना आम्ही पण मोदक चोरीचा प्लॅन केला होता हे सांगितले आणि यावेळी आम्ही मोदक चोरणार असा ठराव मांडला, मग आम्ही दोघे निघालो स्टेजकडे तेव्हा रेतीवरील मंडळी मोदक खात खातच खिक खिक करून हसत आणि त्या वेळी मला पण अटॅक आल्यागत हसू येई पण नुसताच तोंड फाडून हवा फेकल्यागत करून हसू आवरत स्टेजवर आगेकूच केली. माझा सोबतीने भीती लागण्याच्या बहाण्याने माघार घेतली आणि स्टेजच्या बाजूला जाऊन सिमेंटच्या चुंगळीच्या पडद्यातुन दोन्ही हात शिरवून मोदक माझ्या हातात दे म्हणून हातवारे करू लागला मी एकाच ठिकाणी उभा होतो कारण पाय उचलताना  टांग टांग असा सेन्ट्रीगचा आवाज होत होता आणि सुख्या प्रत्येक आवाजानंतर ट्यूबेतून हवा सुटल्यागत श्वास सोडी. मी जेमतेम मोदकाना हात पुरवणार इतक्यातच एका उंचवट्या भागावर पाय पडला नी सेन्ट्रीग जोराने वाजली तसाच सुख्या धामधूम उठला आणि इकडेतिकडे पाहू लागला मी क्षणाचाही विलंब न लावता तिथेच पटकन झोपून गेलो,  त्याला काय झालं ते कळलेच नाही थोडा वेळ तसाच झाकल्या डोळ्याने बसून मान खाजवत पुन्हा झोपी गेला, ही सर्व कारागिरी पाहत रेतीवरची मंडळी बेभान हसत होती तिकडे नित्या पण मध्ये फूस फूस करून मधेच हसू आणत उभा होता, इतक्या हसकुंड्या परिस्थितीतही मी सुख्याजवळ घट्ट तोंड धरून निपचित पडून राहिलो. नंतर सुख्या गाढ झोपी गेला असावा  समजून मी मोदक हातात न धरता पूर्ण ताटच धरून धाव घेतली आणि रेतीकडे आलो सर्व जण तुटून पडले.

असाच एक चोरीचा प्रकार पुन्हा सांगतो, त्यावेळी सातबारा आणि कृषी अधिकारी यांची काहीतरी पावती दिली असता बी एस एन एल ची कृषीची सिम कार्ड मिळायची त्या सिमसाठी एका मित्राने माझ्या सातबाऱ्यावर त्याला सिमकार्ड हवे म्हणून त्याने आग्रह केला. मला पण ती घ्यायचीच होती ठरवून दोघेही सातबारा घेऊन कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो. सातबारा मागताना आधीच वेळ झाली होती म्हणून आम्ही जेवण न करता थेट कार्यालय गाठलं. जवळपास १:३० वाजता आम्ही ऑफिसात पोहचलो. ऑफिसच्या बाहेर तंबाखू घोटत असलेल्या त्या ऑफीसातल्या व्यक्तीने हातवारे न करता, आवाज न काढता मान व डोळे हलवत आम्हाला जवळ बोलवून काय हवंय म्हणून विचारले. त्याला सिमसाठीच्या प्रमानपत्राबाबत विचारले असता, नकीच मिळेल अशी खात्री दिली पण साहेब आणि बाबू आता चाय नास्ता करायला जातील तोवर फिरून ३ वाजेपर्यंत या म्हणून सांगितले तेव्हा भलतीच राग आली पण नकीच मिळेल या शब्दाने थोडेसे शांत होतो. आता २ वाजले होते तोपर्यंत काय करावे हा विचार आम्ही करत होतो आणि जेवण करून न आल्याने भूक पण जोराची लागली होती. काहीतरी घेऊन खाण्याइतके पैसे पण आमच्याकडे नव्हते, आता आम्ही १ तास गपचूप बसल्याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हतो, माझा मित्र बाजूच्या टेबलावर असलेल्या मॅडम कडे टक लावून पाहत बसला मी तिला अधून मधून पहायचा कारण वयान ३५ वर्ष असावी पण अभिनेत्री सारखी होती त्यामुळे थोडसं करमत होतं आणि मग काम बाजूला ठेवून तीही निघून गेली, आता तिथं आम्हा दोघाव्यतिरिक्त कोणी नाही म्हणून आम्हाला चीड आली होती आणि भुकेला पारावर उरला नव्हता इतक्यातच आम्हाला जेवणाचा डब्बा दिसला! तो डब्बा त्या अभिनेत्री सारखी नटून आलेल्या मॅडम चा असावा, माझ्या मित्राने मला प्रश्न केला की मॅडमनी तर डबा आणलाय तर ती हॉटेलात का बरं गेली? मी बरोबर आहे भाऊ तुझं म्हणून गपचूप बसलो. तितक्यात त्याने विचारलं की भाऊ तू जेवण करतो काय?* मी म्हटलं कुठाय जेवण तेव्हा त्याने त्या डब्याकडे बोट दाखवत डोळे मिचकवू लागला, आणि पुन्हा एकदा चोरीचा क्षण आला दोघेही भुकेले असल्याने त्याने माझ्या होकाराची वाट न पाहता डबा आणण्यास आगेकूच केली. त्याने पटकन डबा उचलून बाहेर आणला. मी खूप घाबरलो. डबा जड होता म्हणजे तिथं जेवण नक्कीच असणार याची खात्री पटली आणि तिथुन त्याने धूम ठोकली मीही त्याच्या मागे मागे गेलो व सरळ मागच्या बाजूस झुडपात जाऊन विलंब न करता त्वरित डबा उघडला त्यात पोळ्या, भात, कोबी ची भाजी होती, एक परत दुसरा डब्बा होता त्यात वरण होते. आणि बाजूला केळ पण होते. साबुदाणा खिचडी पण वरच्या बाजूस होती. दोघांनीही कसलाही विचार न करता खायला लागलो . ते खातांना विचारही यायचा की मॅडम उपाशी राहिल बिचारी पण ती हाटेलात गेली म्हणजे काहीतरी खाऊन पिऊन येईल अशी स्वतःशीच समजूत घालत काही मिनीटात तो डबा उडवला. केळ आणि साबुदाणा खिचडी यावरून वाटत होते की, मॅडम चा उपवास असावा. पण मग भाजी, पोळी कशासाठी? तेव्हा शेवटी निष्कर्ष काढला की, ते कोण्या दोघा जणांचे डब्बे असावे ज्यात एकाचे उपवास असावे आणि दुसऱ्याचे नसावे. या निष्कर्षावर चर्चा करत झुडपाच्या बाजूलाच एक नळ आहे तिथं पाणी व हाथ धून डबा पण धुवून घेतला आणि हळूच आफिसाकडे  पाहिलं तर मंडळी अजून यायचीच होती, भरभर आफिसाकडे धावत जाऊन डबा तिथल्या तिथे ठेवून पुन्हा खुर्च्यांवर जाऊन बसलो तितक्यात मॅडम येतांना दिसली बाजूच्या मित्राने भाकीत वर्तवल की जर ती डबा उघडेल तर आपण उघडे पडू म्हणून खड्यात गेली सिम आणि प्रमाणपत्र म्हणून ढुंग....ला पाय आपटत तिथून पळालो.


अशा खाण्याच्या छोट्या मोठ्या चोऱ्या तर खूप झाल्या, आता तुम्हाला सांगतो एका वेगळ्याच चोरलेल्या वस्तूचे प्रसंग. मी आणि माझा एक मित्र आम्ही एका कार्यालयात जाऊन फॉर्म भरत होतो, खूप लांब लाईन लावून विद्यार्थी आधीच ताटकळत उभे होते. आम्हाला जवळपास दोन तास लागणार होते. अधून मधून आम्ही एकमेकास लाईनीत उभे ठेवून पाणी पिण्यास, मित्र विसर्जनास जात होतो. खूप वेळ उभे राहिल्याने अजिबात काहीच सुचत नव्हते. तितक्यातच माझ्या मित्राने मला विचारले, " तुला आई म्हणत होती की, काच मिळाला तर आणशील" आणि तो मला म्हणाला की, तुला पाहिजे का काच ? मी त्याला होकारार्थी उत्तर देत कोठे आहे आहे विचारले. तर त्याने त्याच्या बोटाने ते काच दाखविले. ऑफिसात ठेवलेलं काच थोडसं फुटले होते. तसे काच आम्ही घराच्या कवेलूच्या मधे लावतो त्यामुळे खूप उजेड पडतो घरात. आता आमचा नंबर लागला होता. फॉर्म भरून मी जाण्याच्या तयारीत होतो. तेव्हा तो काच धरून घे असे म्हणाला. मी विचारलं कस काय नेऊ आपण ? तेव्हा म्हणाला, "तू फक्त पकड बाकी मी सर्व प्लॅनिंग केली आहे".


मी घाबरत ते आपल्या काखेत पकडुन त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. त्यावेळेस अनेक विद्यार्थी माझ्याकडं बघत होती. मात्र कोणीच काही बोलले नव्हते. सेकंड फ्लोर उतरून फर्स्ट फ्लोअर वर आम्ही पोहचलो. इथपर्यंत सर्व ठीक होते, सेकंड फ्लोअर वर एका सरांनी माझ्याकडं बघत " काच कोठे घेऊन चालला" विचारले. तेव्हा मित्र एकदम म्हणू लागला " अरे पटकन घे, तिकडे खाली घेऊन जा, आणखीन वस्तू आणायच्या आहे". आता मात्र ते सर स्तब्ध झाले आणि आपल्या मार्गाला लागले. आणि मीही आपल्या मित्राच्या मागे मागे जाऊ लागलो. परत खाली दोन चार जण जवळ येताना पाहून तो मित्र अधिकच तीव्र आवाज काढत," पटकन घे तिकडे आणि परत ये " असे उद्गार काढले. तेव्हा मात्र ते तिघेही जण गुमाण पाहतच राहिले. मी आता बाहेर पडलो होतो. सायकल जवळ काच घेऊन तो मित्र कधी येईल याची वाट पाहत होतो. तो पण थोड्याच वेळात बाहेर पडला. 

अशा अनेक चोऱ्या मी केल्यात किंवा चोरीत सामील झालो...त्या पुन्हा कधीतरी जरूर शेअर करेन.


- गडचिरोलीकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या