पोळा - बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!
भारतीय कृषि संस्कृतीचे दर्शक,
महापर्व पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
आला सण बैल
पोळ्याचा..!
बैल राजाच्या कौतुक
सोहळ्याचा..!
Happy Bail Pola
पोळा हा सण बैलपोळा, बेंदूर या नावानेही ओळखला जातो. हा सण श्रावण किंवा भाद्रपद या मराठी महिन्यात येत असतो. या दरम्यान वेगवेगळ्या प्रदेशात साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. पोळा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मराठी सण आहे.
हा सण महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व गोकुळाष्टमी या सणांबरोबर श्रावण संपत संपत असतांना अमावास्येला हा सण साजरा केला जातो. या सणाविषयी आज आपण माहिती पाहूया.
बैलपोळा
ऑगस्ट च्या अखेरीस शेतीचे कामे आटोपत आली कि, बैलांना थोडीफार विश्रांती असावी व त्याचे आभार मानावे हा बैलपोळा सणाचा हेतू . त्यापूर्वी त्यांना रोज शेतीच्या कामात गुंतूनच ठेवले जाते.
मग वर्षभर बैल हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून त्याला मदत करत आपला काम करत असतो. त्या कष्टकरी बैल मित्राच्या पूजेचा हा दिवस. त्याला ओवाळण्याचा त्याची पूजा करण्याचा दिवस पोळा. आणि म्हणूनच यास बैलपोळा सुद्धा म्हंटले जाते.
पोळा सणाची विशेषतः - ( शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण.)
पोळा हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण देशातील वेगवेगळ्या भागात हा सण तेथील शेतकऱ्याकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणासाठी शेतकरी यामध्ये खूप उत्साह असतो. या सणाला घरोघरी आपल्या घराच्या दारास आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते.
घरी पुरणपोळी, चकल्या, शंकरपाळे, भजी, डाळीचे वडे यांसारखी पकवान बनविली जातात. प्रत्येक शेतकरी हा आपल्या बैलाला आपल्या ताकदीनिशी सजवीत असतो. या दिवशी बैलाला गावातील तलावात किंवा गावाजवळील नदीमध्ये स्वच्छ अंघोळ करून दिली जाते. त्याला सुंदर सजविले जाते. व त्याची पूजा केली जाते.
या दिवशी बैलाला कोणतेच काम दिले जात नाही हा दिवस त्यांना पूर्ण विश्रांती दिली जाते.
गडचिरोलीकडील भागात असा साजरा होतो बैलपोळा..
पोळा हा वेगवेगळ्या भागात तेथील परंपरेनुसार साजरा होत असतो. गडचिरोलीकडील किंवा पूर्ण विदर्भात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या भागात पोळ्याच्या सणाला बैलास अंघोळ करून दिली जाते.
वर्षभर खांद्या वर काम करणारा बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकले जाते. यास "खांद शेकणे" असे म्हणतात. त्याला झूल ( पाठीवर शाल म्हणून बनविलेले सुंदर नक्षिकाम केलेले वस्त्र ) लावून सजविले जाते. शिंगाना बेगड किंवा रंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, वेसण , कासरा ( बैलांना आवरण्याची असलेली दोरी ), पायात करदोळ्याचे तोडे घालून संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके मारून सजविले जाते.
आपला बैल उठून दिसावा या आनंदाने सर्व शेतकरी आपापल्या बैलांना सुदंर सजवीत असतात.
गृहिणी घरी बैलांसाठी नैवैद्य बनवितात. त्यात मुख्यतः पुरणपोळी व पुऱ्या बनविली जाते. काटवल, दोडका , डाळ या सारख्या व अनेक भाज्यांच्या मिश्रण असलेला जेवण बैलांना खाऊ घालण्यास बनिवतात. बैलांची निगा राखणाऱ्या ( गायकी ) बैलकरी गडी यास नवीन कपडे त्यांच्या मालकांमार्फत दिले जाते.
बैलपोळा सण आणि शेतकरी
बैलांना सजवून सर्व शेतकरी आकरावर ( बैल चारून त्यांना बसण्यास असलेली जागा ) आणतात. त्याठिकाणी एका शेवटच्या टोकावर आंब्याचे तोरण बांधले जाते.
काही भागात गावातील मारुती मंदिराच्या परिसरात बैलांना सजवून डपरे, ढोल, ताशा या वाजंत्री बरोबर त्या ठिकाणी आणले जाते. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना त्याठिकाणी आणतात. या दरम्यान शेतकरी मित्र व बैल मित्रांकडून झडत्या म्हंटल्या जातात. " हर बोला हर हर महादेव.... " या जयघोषाने संपूर्ण आकर किंवा परिसर दुमदुमले जाते. त्यानंतर गावातील वरिष्ठ मान असलेल्या व्यक्तीकडून ती आंब्यांची तोरण तोडली जाते. व पोळा फुटला असे समजले जाते.
त्यानंतर बैलांना मारुतीच्या देवळात ओवाळून त्यांना घरी नेऊन पाय धुवून ओवाळले जाते. दरम्यान पोळा फुटला असे समजताच बैलांना एकदम सोडून दिले जाते. यावेळेस प्रत्येक बैल हर्ष आनंदाने पळत सुटतो त्यामागे शेतकरी सुद्धा तितक्याच आनंदात पळत सुटतो. हा क्षण सांगण्यापेक्षा पाहण्यात खूप हर्षपूर्ण आहे. .
त्यांनतर बैलांना घरोघरी ओवाळण्यास नेण्यात येते. प्रत्येक घरी त्यांची पूजा केली जाते. घरी येताच शेतकरी व बैल यांना तांब्याच्या किंवा लोट्याने पाय धुवून स्वागत केले जाते. त्यांची पूजा करून गृहिणीने बनविलेले नैवेद्य बैलांना खायला घालले जाते. त्यानंतर अप्रत्यक्ष बैलाला आनंदाची मदत म्हणून त्या बैल मालकाला भोजारा ( वर्षभर केलेल्या मदतीस आनंदाची भेट वस्तू, पैसे ) दिले जातात.
या दिवशी सर्व जण बैलांची पूजा करतात. तर ज्यांच्याकडे बैल नाही त्यांच्याकडे दुसऱ्या शेतकऱ्याकडून त्याच्या पूजेसाठी बैल पूजेसाठी नेले जातात.
तान्हापोळा
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हापोळा हा उत्सव साजरा केला जातो.
वर्षभर राबणारा शेतकरी आणि त्याचा बैल हा एक दिवस इतक्या आनंदात साजरा करतात कि, तो बैल आणि शेतकरी सुद्धा पुढे वर्षभर राबण्याची ऊर्जा या सणातून मिळवितो. हा त्या दोघांच्या बद्दल आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपणही मोठ्या उत्साहाने साजरा करूया .
आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box