...त्याची 'कला' च त्याच्या जीवनाचा आधार बनली ! (एका ध्येयवेड्या तरुणाची आश्चर्य करायला भाग पडणारी दास्ता)
लेखक स्वप्नील प्रमोद जुआरे हे गडचिरोली जिल्हयातील असलेले लेखन कलेतून अनेक विषयांवर प्रकाश टाकत असतात, नुकताच त्यांचा एक लेख समाज माध्यमांवर वाचायला मिळाला. " मागता येईना भिक तर मास्तरकी शिक..!" ह्या म्हणीला भाव देत माणसाच्या अंगातली कला कशी त्याला आधार देते याचे प्रत्यक्ष अनुभव आलेल्या आपल्या मित्र आणि त्याच्या कलेबद्दल लिहिलेले हे लेख अनेकांपर्यंत पोहचावे हा आमचा छोटासा प्रयत्न. ह्यातून प्रत्येक कलाकाराला नक्कीच ऊर्जा मिळेल..! सोबतच ज्यावर हे लेख समर्पित आहे त्यांच्या कलेला वाव आणि प्रोत्साहन मिळेल.
घरात अठराविश्व दारिद्र्य... शेती तर मुळात नाहीच! तर कुटुंबात उत्पन्नाचा दुसरा कुठलाही साधन नसताना केवळ परंपरागत बांबुकामाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या मिळकतीतून संसाराचा गाडा चालविणे तसेच मुलांचे शिक्षण व संगोपन...! घरात आईवडील, दोन भाऊ, दोन बहिणी असा एकत्रित सहा जणांचा कुटुंब पण कालांतराने बहिणींचे लग्न झाले. थोडाफार ओझा ( जबाबदारी) कमी झाला असं वाटलं..! परंतु या आधुनिकीकरणामुळे बांबूच्या टोपल्या, सुपांची जागा मात्र प्लास्टिक च्या वस्तूंनी घेतली आणि इथेच व्यवसायाला काहीसा ब्रेक लागला! आर्थिक अडचणींची बाब निर्माण झाली. घर कसं चालवावं ? मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपत नव्हता! परंतु पु. ल. देशपांडे म्हणतात, " पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगुन जाईल!" आणि याच ओळींप्रमाणे कुटुंबातील सर्वात लहान मुलाची चांगलीच गट्टी जमली ती म्हणजे मुर्तीकलेशी! आणि आज हीच कला त्याच्या जीवनाचा आधार बनली...! अगदीच बालपणापासून त्याला चित्रकलेची तसेच मुर्तीकलेची आवड ! म्हणून इयत्ता सातवी पासूनच श्रीकृष्णाच्या, श्रीगणेशाच्या, शारदा, दुर्गा अशा विविध प्रकारच्या मुर्त्या तयार करून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचा त्याचा हा बालमानस! घरात मुर्तीकलेचा कुठलाही वारसा नसताना देखील त्याच्या आकर्षक, उठावदार मुर्त्यांकडे एकटक आश्चर्याने पाहायला लावणारा हा त्याचा अनोखा प्रवास !
हा प्रवास मी या लेखणीतून रेखाटतोय, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात इंदिरानगर बर्डी येथे वास्तव्यास असलेल्या माझ्या वर्गमित्राचा अर्थात निखील सुरेश हिरापुरे या ध्येयवेड्या तरुणाचा....!!! हायस्कूलचे शिक्षण घेत असताना एलिमेंटरी / इंटरमिजियेट चित्रकला ग्रेड परीक्षेच्या काळात आम्ही सोबतच होतो. बालपणापासूनच निखीलला कलेची आवड आणि परत विद्यालयातील कलाशिक्षक श्री. श्रावण कामडी सरांचे मार्गदर्शन या सर्व बाबींमुळे निखिलच्या जीवनात कलेची गोडी वाढली. निखील होतकरू आणि जिद्दी असल्याने तो तेवढ्यावरच थांबला नाही तर इंटरमिजियेट नंतर त्याने नवरगाव ता. सिंदेवाही येथील ज्ञानेश चित्रकला महाविद्यालात आर्ट टीचर डिप्लोमा (ATD) ला प्रवेश घेण्याचे ठरविले. परंतु कॉलेजच्या फी साठी पैसे आणायचे कुठून ? हा गंभीर प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला! म्हणूनच श्रीकृष्णाच्या श्रीगणेशाच्या, शारदा, दुर्गा यांच्या मुर्त्या तर सिमेंटचे पुतळे, पेंटीग, पुटिंग, 3D मॉडेल, स्ट्रक्चर इत्यादी. अनेक सीजनेबल कामे करून आणि त्यातून मिळणाऱ्या भांडवलीतून कॉलेजची फी तसेच घरकुटुंबाला हातभार लावू लागला.
कुटुंबाला दुसरा कुठलाही जोडव्यवसाय नसल्याकारणे आजही निखिलची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. केवळ त्याची कलाच त्याच्या व त्याच्या कुटुंबाचा जगण्याचा आधार बनलेली आहे. आणि म्हणूनच ग्राहकांचा आकर्षण आणि व्यवसायात वृद्धी व्हावी हा दृष्टीकोन बाळगून मागील वर्षी निखीलने 'श्री गणेश कला केंद्र' या नावाने भव्य विक्री प्रदर्शन सुद्धा चालविले. त्याचाही त्याला बराचसा फायदा झाला. आणि म्हणूनच या आर्टिकलच्या माध्यमातून मला असे वाटते, की प्रत्येकाने अर्थात (ज्यांना आवश्यकता आहे) त्यांनी निखिलच्या घरी भेट द्या, मूर्तिकाम बघा, आवडल्यास नक्की खरेदी करा आणि त्याच्या या व्यवसायास समाजसेवेचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न म्हणून आर्थिक हातभार लावा. आणि मला विश्वास आहे, श्रीकृष्णाच्या, श्रीगणेशाच्या, आकर्षक... उठावदार आणि सुंदर मुर्त्या बघुन तुम्ही सुद्धा भारावून जाल !
मला वैयक्तिकपणे असे वाटते, की आपण एकदातरी भेट दिली पाहिजे. कारण मी स्वतः निखीलचा ग्राहक असून मला जाणवलेली निखिलच्या मुर्तीकलेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे........
१) व्यवसाय तर एक उपजीवेकेचा भाग आहे परंतु सर्वप्रथम हा त्याचा छंद असल्याकारणे उत्तम Quality, स्वस्त दर हे त्याचे ठळक वैशिष्ट्य !
२) पर्यावरणपूरक ओरीजनल मातीच्या सुबक मुर्त्या.
३) मूर्तीची आकर्षक आणि उठावदार बैठक.
४) उच्च Quality चे रंग !
५) मूर्तीची सुंदर सजावट.
अशाप्रकारे हा लेख लिहण्यामागचा प्रामाणिक उद्देश हाच की, मित्राच्या कलेची प्रशंसा व्हावी, आपणासारख्या वाचक प्रेक्षकांपर्यंत तथा ग्राहकांपर्यंत माहिती पोहचवावी. बस्सं एवढचं !
....ही सत्य कहाणी होती, एका कलावंताची.... एका ध्येयवेड्या तरुणाची...... वरील लेखाचा कुठलाही वाईट हेतू नसून मैत्रीच्या नात्याने मित्राच्या व्यवसायात मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अशाप्रकारे मी लेखक स्वप्नील प्रमोद जुआरे या लेखणीतून आपला निरोप घेतोय अर्थात
पूर्णविराम देतोय.
धन्यवाद !
संपर्क / क्रमांक
Nikhil art's :- निखिल एस. हीरापुरे 7666069057
इंदिरा नगर बर्डी, हितकारीणी कॉलेजच्या मागे, आरमोरी
0 टिप्पण्या
Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box